मुंबई- लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असलेले क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहेत. पण त्याचबरोबर मोकळ्या वेळेत काही गंमतीशीर व्हिडिओदेखील ते शेअर करत आहे. भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनने पत्नी आयेशासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात दोघे डान्स करताना दिसत आहेत.
शिखरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तो पत्नी आयेशासोबत 'ढल गया दिन, हो गई शाम' या गाण्यावर फिल्मी अंदाजात डान्स करतानाचा पाहायला मिळत आहे. व्हिडिओत शिखरने जितेंद्रच्या स्टाइलमध्ये कपडे घातले आहेत आणि आयशाने लीना चंदावरकर या अभिनेत्रीसारखा लुक केला आहे.
दरम्यान, हे गाणं हमजोली चित्रपटातील असून यावर जितेंद्र आणि लीना यांनी बॅडमिंटन खेळत अभिनय केला होता. तसा अभिनय शिखर आणि आयशाने टेबल टेनिस खेळत केला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. याआधी शिखरने घरात कपडे धुवताना आणि कमोड साफ करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.