हेमिल्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला उद्या (बुधवार) पासून सुरूवात होणार आहे. या मालिकेआधीच भारताला रोहित शर्माच्या रुपाने धक्का बसला. रोहित दुखापतीमुळे एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. रोहितच्या दुखापतीने सलामीचा प्रश्न ऐरणीवर आला. तेव्हा कर्णधार विराट कोहलीने मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉ एकदिवसीय मालिकेत सलामीला येऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. तो पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता.
शिखर धवन दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकला. तेव्हा रोहित शर्मासोबत केएल राहुलने पहिल्या तीन टी-२० सामन्यात सलामी दिली. आता रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातील उर्वरीत एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. यावर विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया नोंदवली.