दुबई -दोन वर्षांच्या कार्यकालानंतर शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ही माहिती दिली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेले मनोहर यांना तिसऱ्यांदा दोन वर्षाची मुदतवाढ नको होती.
एका प्रसिद्धीपत्रकात आयसीसीने म्हटले, ''आयसीसी बोर्डाने बुधवारी बैठक घेतली. उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा हंगामी उत्तराधिकारी म्हणून मनोहर यांची जागा घेतील.'' अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पुढील आठवड्यात आयसीसी बोर्डाकडून मान्यता मिळणे अपेक्षित आहे.
"आयसीसी बोर्ड, कर्मचारी आणि संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने मी शशांकचे नेतृत्व आणि त्यांनी आयसीसीचे अध्यक्ष या नात्याने खेळासाठी जे काही केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आम्ही त्यांना आणि त्यांच्या परिवारास भविष्यासाठी शुभेच्छा देतो, "असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनु सहानी म्हणाले.
नवनियुक्त अध्यक्ष ख्वाजा म्हणाले, ''आयसीसी बोर्डावरील प्रत्येक व्यक्ती शशांक यांच्या वचनबद्धतेबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते.''
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) प्रमुख कोलिन ग्रेव्ह, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि क्रिकेट वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे (सीडब्ल्यूआय) प्रमुख डेव्ह कॅमेरून हे आयसीसीयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.