मुंबई- आयसीसी आणि बीसीसीआयने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शार्दुल ठाकूरने आउटडोअर सरावाला सुरूवात केली. पण त्याचा हा सराव वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण सरावासाठी शार्दुलने परवानगीच घेतलेली नसल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
केंद्र सरकारने देशातील मैदाने व स्पोर्टस कॉम्पलेक्स खेळाडूंना सरावासाठी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी खेळाडूंना काही अटी व नियम घालून दिले आहे. याशिवाय क्रिकेटपटूंसाठी आयसीसी व बीसीसीआयनेही काही मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. याचे पालन करून शार्दुल ठाकूरने आऊटडोर ट्रेनिंग सुरू केले आहे.
लॉकडाऊनमध्ये आऊटडोअर सराव करणारा शार्दुल भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला. त्याने पालघरमधील आपल्या घराजवळील मैदानावर सराव सुरू केला आहे. यावेळी शार्दुलसोबत सराव करण्यासाठी काही स्थानिक खेळाडूही होते, ज्यात मुंबई रणजी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेचाही समावेश होता.
शार्दुलने सरावाला सुरुवात करण्याआधी बीसीसीआयची परवानगी घेतलेली नाही. यामुळे बीसीसीआय शार्दुलवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भातील वृत्त आयएएनएसने दिले आहेत.