नवी दिल्ली - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात एकदिवसीय मालिकेला रविवारपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याच्या जागी मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला. त्यात भर म्हणून गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही या मालिकेतून माघार घेतली आहे. भुवनेश्वरला तिसऱ्या टी-20 सामन्यात दुखापत झाली. त्यामुळं त्यानं माघार घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) यांची अधिकृत घोषणा केली आहे.
चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या भुवीची दुखापत वानखेडेवर झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पुन्हा उफाळून आली. त्याची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं त्याच्या दुखापतीबाबत अजून कोणताच धोका पत्करायचा नसल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, वानखेडेच्या टी-20 सामन्यात भुवनेश्वरला वैद्यकीय मदत घ्यावी लागली होती. दरम्यान, भारताने हा सामना 67 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.