जयपूर - शार्दुल ठाकूरने विजय हजारे करंडक स्पर्धेत धडाकेबाज खेळी केली. त्याने ५७ चेंडूत ९२ धावांची खेळी साकारली. यात ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. शार्दुलचे शतक फक्त ८ धावांनी हुकलं. त्याच्या या वादळी खेळीमुळे मुंबईने हिमाचल प्रदेशसमोर ३२१ धावांचा डोंगर उभारला.
मुंबईने प्रथम फलंदाजी केली. तेव्हा मुंबईचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या ८ धावांवर माघारी परतले होते. यशस्वी जैस्वाल (२), पृथ्वी शॉ (२) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२) हे अपयशी ठरल्यानंतर फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने मुंबईची पडझड रोखली. त्याने सर्फराज खानसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. सर्फराजचा अडथळा जसवालने दूर केला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांनी हिमाचलच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.