मुंबई- केंद्र सरकारने देशातील मैदाने व स्पोर्टस कॉम्पलेक्स खेळाडूंना सरावासाठी सुरु करण्याची परवानगी दिली आहे. पण, यासाठी खेळाडूंना काही अटी व नियम घालून दिले आहे. याशिवाय क्रिकेटपटूंसाठी आयसीसीने व बीसीसीआयनेही काही दिशानिर्देश जारी केले आहे. याचे पालन करुन शार्दुल ठाकूरने आऊटडोर ट्रेनिंग सुरू केली आहे. लॉकडाऊनमध्ये आऊटडोअर ट्रेनिंग करणारा शार्दुल भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला.
शार्दुलने पालघरमधील आपल्या घराजवळील मैदानावर सराव सुरू केला आहे. यावेळी शार्दुलसोबत सराव करण्यासाठी काही स्थानिक खेळाडूही होते, ज्यात मुंबई रणजी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेचाही समावेश होता. सरावानंतर पीटीआयशी बोलताना, दोन महिन्यानंतर आम्ही सराव केला आहे, खूप बरं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
शार्दुलने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी नोंदवली. तेव्हा त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत ११ एकदिवसीय, १५ टी-२० आणि एका कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.