मेलबर्न - क्रिकेट जगतातील नामवंत फिरकीपटू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नला ओळखले जाते. या खेळात हिमालयासारखी विक्रमांची अनेक शिखरे गाठल्यानंतर, वॉर्नने प्रशिक्षक आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेलाही योग्य न्याय दिला. क्रीडाविश्वात आणि मैदानाबाहेर 'शेन वॉर्न' हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला. आता एका नव्या कारणामुळे वॉर्न परत एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
हेही वाचा -'दोस्ती तर आहे आमची राईट, पण मॅटवर गेल्यावर चुरशीची होईल फाईट'
गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या भीषण वणव्याचे लोण सर्वत्र पसरले. देशातील विविध राज्यांमध्ये लागलेल्या या आगींमध्ये आतापर्यंत १,५०० घरे उद्ध्वस्त झाली. तर, लाखो हेक्टर जमीन आगीखाली गेली. या संकटाचा सामना करण्यासाठी या फिरकीच्या जादुगाराने पुढाकार घेतला आहे. आपल्या तब्बल १४५ कसोटी सामन्यात वापरलेली हिरव्या रंगाची कॅप वॉर्नने लिलावात काढली आहे. या लिलावातून मिळणारा सर्व निधी वॉर्न 'ऑस्ट्रेलियन रेडक्रॉस आपत्ती निवारण पुनर्वसन फंड'ला सोपवणार आहे.
'जंगलांच्या भीषण आगीने आपल्या सर्वांना हादरवून सोडले आहे. या आगीत अनेकांचे जीव गेले, घरे उद्ध्वस्त झाली आणि 50 कोटींहून अधिक प्राण्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आम्ही दररोज पीडितांसाठी मदत आणि सहयोग देण्याचे मार्ग शोधत आहोत आणि म्हणूनच मी माझ्या प्रिय 'बॅगी ग्रीन कॅप'चा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे', असे वॉर्नने म्हटले आहे.
वॉर्नच्या या निर्णयाचे माजी संघातील सहकारी डॅरेन लेहमन आणि जेसन गिलेस्पी यांनी कौतुक केले. क्रिकेटपटूंव्यतिरिक्त अनेक टेनिस खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया 'बुशफायर रिलीफ फंडा'च्या वतीने देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे.