मुंबई - भारताविरुद्धच्या चेन्नई कसोटीत, पहिल्या डावामध्ये २४१ धावांची आघाडी मिळून देखील इंग्लंड संघाने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या डावात फलंदाजी केली. इंग्लंडच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न नाराज झाला आहे. त्याने शेलक्या शब्दात इंग्लंडच्या संघाला सुनावले आहे.
शेन वॉर्नने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यात तो म्हणतो की, 'इंग्लंड संघाने पहिल्या डावात खूप वेळ फलंदाजी केली. त्यांनी डाव घोषित करणे आणि वेगाने धावा करून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण करणे या पर्यायाला संपवत विजयाचे दरवाजे जवळजवळ बंद केले. पाहुण्या संघाला आता कळत नाही आहे की, विजयाचा मार्ग कसा निर्माण करावा.'
इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाअखेर १ बाद ३९ धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या डावापाठापोठ दुसऱ्या डावात देखील अपयशी ठरला. जॅक लिचच्या गोलंदाजीवर तो १२ धावांवर त्रिफाळाचित झाला.
अखेरच्या दिवशी भारतीय संघाला ९० षटकांत ३८१ धावा करायच्या आहेत. तर इंग्लंड संघाला विजयासाठी ९ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुबमन गिल १५ आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद होते. दरम्यान, २००८ साली भारतीय संघाने चेन्नईमध्ये इंग्लंड विरोधातच चौथ्या डावात ३८७ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. यात सचिन तेंडुलकरने शानदार शतक झळकावले होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाज कशी फलंदाजी करणार यांची उत्सुकता आहे.
चौथ्या दिवशी पाहुण्या संघाने पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या डावात फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात अचूक टप्यावर मारा करत इंग्लंडला १७८ धावांवर रोखले आणि भारताला विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक ६ गडी बाद केले.
हेही वाचा- IND vs ENG : भारताला विजयासाठी ३८१ धावांची गरज
हेही वाचा -ICC Test Ranking: पाकिस्तानची मोठी झेप; भारतीय संघ कितव्या स्थानी