नवी दिल्ली - फिरकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या शेन वॉर्नचा आज ५० वा वाढदिवस आहे. १३ सप्टेंबर १९६९ ला ऑस्ट्रेलियाच्या फंन्ट्री गलीमध्ये वॉर्नचा जन्म झाला. क्रिकेटच्या कारकिर्दीत त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. पण, त्याने माईक गेटींगला टाकलेला चेंडू 'न भूतो न भविष्यति' असा होता.
हेही वाचा -ईसीबीच्या क्रिकेट समितीच्या चेअरमनपदी अँड्र्यू स्ट्रॉसची निवड
गेटींगने स्वत: या चेंडुला शतकातला 'सर्वोत्तम चेंडू' म्हटले आहे. २५ वर्षापूर्वी वॉर्नने हा चेंडू टाकला होता. १९९३ मध्ये खेळलेल्या अॅशेस मालिकेत त्याने इंग्लंडचा फलंदाज माईक गेटींगला स्वप्नवत असा चेंडू टाकला होता. या चेंडूचा व्हिडिओ आजही लोकांच्या स्मरणात आहे. गेटींगने हा चेंडू वाईड समजून सोडला होता. मात्र हा चेंडू गेटींगचा ऑफ स्टम्प घेऊन गेला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वॉर्नने १९४ सामन्यांत २९३ विकेट्स घेतल्या आहेत. ३३ धावांत ५ बळी ही एकदिवसीय क्रिकेटमधील वॉर्नची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये १४५ सामन्यांत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत.
मुथय्या मुरलीधरननंतर कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. मुरलीधरनने ८०० विकेट घेतल्या आहेत. वॉर्नने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक भन्नाट चेंडू टाकले. पण, गेटींगला टाकलेला तो चेंडू अजुनही लोकांच्या स्मरणात राहिला आहे.