मुंबई - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात येण्याची अथवा आलटून-पालटून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे कारण...
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. यानंतर चार सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरूवात होईल. ही मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होणार असून या मालिकेपूर्वी दोघांचाही लाल चेंडूद्वारे गोलंदाजीचा पुरेपूर सराव व्हावा, या हेतूने संघ व्यवस्थापन असा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे बुमराह-शमी यांची जोडी यापैकी एकाच प्रकारात खेळताना पाहायला मिळू शकते.
संघ व्यवस्थापनातील एका सदस्याने सांगितले की, बुमराह आणि शमी दोघेही भारताच्या कसोटी संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. जर ते टी-२० मालिकेत खेळले, तर त्यांना पहिल्या सराव सामन्याला मुकावे लागेल. मात्र कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे एक तर दोघांनाही या मालिकेसाठी विश्रांती देण्याच्या अथवा त्यांना आलटून पालटून संधी देण्याच्या विचारात संघ व्यवस्थापन आहे.