मुंबई- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी नेहमी वादग्रस्त आणि अजब वक्तव्यामुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याने काश्मीर मुद्यावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावरून भारतीय खेळाडू गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंह, सुरैश रैना यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आता शाहिद आफ्रिदीने एक अजब वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरून नेटिझन्सनीं, त्याला मोठया प्रमाणावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
माझ्या आयुष्यावर चित्रपट काढला तर त्यातील इंग्रजी भाषेतील चित्रपटात टॉम क्रूझ तर उर्दूत आमीर खान यांनी माझी भूमिका करावी, अशी इच्छा शाहिद आफ्रिदीनेजाहीर केली आहे. यावरून नेटिझन्सनीं आफ्रिदीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका भारतीयाने तर आफ्रिदीला, तू पाकिस्तान दोन वेळा विकला तरी आमीर खानच्या अभिनयासाठीचे पैसे देऊ शकणार नाही, असे म्हटले आहे.
एकाने टॉम क्रूजसोबत चित्रपट केला तर पाकिस्तान विकला तरी पैसे कमी पडतील, असे म्हटले आहे. आणखी एकाने चित्रपटाची कथा सांगितली आहे. चित्रपटाच्या पहिल्या सीनमध्ये आफ्रिदी फलंदाजीसाठी उतरतो आणि पहिल्याच चेंडूवर बाद होतो. शेवटच्या सीनमध्ये आफ्रिदी फलंदाजीला येतो आणि पुन्हा शून्यावर बाद होतो. चित्रपट संपला..., अशी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि मोदींबाबत काय म्हणाला आफ्रिदी....
शाहिद आफ्रिदी पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात गरजूंना मदत करण्यासाठी गेला होता, तिथे त्याने भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान केले. तो म्हणाला, सध्या जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. पण या कोरोनापेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदी यांना धर्माचा आजार झाला आहे. धर्माच्या नावावर ते राजकारण करत आहेत. ते काश्मिरीवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवत आहेत, पण ते फार मोठे भित्रे आहेत. त्यामुळेच त्यांनी काश्मीरमध्ये सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहीत नाही की, त्या ७ लाख सैनिकांच्या मागे पाकची २२-२३ कोटी जनता उभी आहे, असे त्याने म्हटले.