कराची - १९ वर्षीय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी एका नव्या प्रकरणामुळे परत एकदा चर्चेत आला आहे. पत्रकार परिषदेत शाहीनने एका पत्रकाराला वर्णद्वेषी वागणूक दिली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
हेही वाचा -अंतिम वन-डेपूर्वी शिवम आणि होल्डर खेळताहेत टेबल टेनिस, पाहा व्हिडिओ
सध्या पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातील दुसऱ्या सामन्यातील एका डावात शाहीनने पाच बळी मिळवत विक्रमाला गवसणी घातली. त्यानंतर पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत शाहीनने पत्रकारावर 'जरा तुमच्यावर प्रकाशाचा फोकस मारा, जेणेकरून तुम्हाला मी पाहू शकतो', अशी टिपण्णी केली. त्यामुळे संबंधित पत्रकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) तक्रार केली आहे.
शिवाय, या पत्रकाराने शाहीनकडून जाहीर माफीची मागणी केली आहे. शाहीनच्या या व्हिडिओमुळे त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत असून आयसीसी यासंबंधी काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरलाही वर्णद्वेषी वागणूकीचा फटका सहन करावा लागला होता.
इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांनी वर्णद्वेषाचे भाष्य केले असल्याचा दावा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केला होता. या घटनेबद्दल न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने(एनजेडसी) आर्चरची माफी मागितली होती.