मेलबर्न - जागतिक महिला दिनी रंगलेल्या महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. स्पर्धेत चांगल्या फॉर्मात असलेली भारताची शफाली वर्मा अंतिम सामन्यात मात्र ढेपाळली.
हेही वाचा -तमिम इक्बाल बांगलादेशचा नवा कर्णधार
या स्पर्धेदरम्यान जाहीर झालेल्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत शफालीने अव्वल स्थान काबीज केले होते. मात्र, अवघ्या तीन दिवसात तिला हे स्थान सोडावे लागले आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत शफाली तिसऱया स्थानावर ढकलली गेली आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ७८ धावांची खेळी करणारी बेथ मूनी अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. भारताची माजी कर्णधार मिताली राज हिच्यानंतर अव्वल स्थान पटकावणारी शफाली पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली होती. मात्र, बेथ मूनी २ स्थानांच्या सुधारणेसह ७६२ गुणांची कमाई करून 'टॉप'वर पोहोचली आहे. मूनीने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक २५९ धावा केल्या आहेत.
तर, गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जेस जोनासेन अव्वल पाचात आली आहे. भारताच्या दीप्ती शर्माची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. तर, इंग्लंडची सोफी एक्लेस्टन पहिल्या स्थानी कायम आहे.