नवी दिल्ली - भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने रविवारी कोरोनाविरूद्ध लढणाऱ्यांसाठी एक कृतज्ञता संदेश दिला आहे. यासोबत त्याने भारतीयांना केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचे आवाहन केले.
“तुम्ही अजून खरा त्रास पाहिलेला नाही”, सेहवागने दिला भारतीयांना संदेश
सेहवागने भारतीयांना केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचे आवाहन केले. यासोबत त्याने कोरोनाविरूद्ध लढणाऱ्यांसाठी एक कृतज्ञता संदेश दिला आहे.
"आम्ही आमच्या घराबाहेर पडण्यास सक्षम नाही, आम्ही सकाळच्या फिरायला जाऊ शकणार नाही, शॉपिंग मॉल्समध्ये जाऊ शकणार नाही, जर तुम्हाला असं वाटतं की हे त्रासदायक आहे, तर मला म्हणायचे आहे की तुम्ही खरोखर त्रास पाहिलेला नाही. आयुष्यात डॉक्टर, परिचारिका, पोलिस आपल्या जिवाची चिंता करीत नाहीत आणि आपण सुरक्षित आहोत याची खात्री करुन घेत आहेत. त्यांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आपण सुरक्षित राहा आणि जे काही पाळले पाहिजे त्याचे पालन करा”, असे सेहवागने ट्विटरवरील व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले आहे.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत ३४ जणांचा या व्हायरसने जीव घेतला आहे. रविवारी भारतात कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या ८३५६ पर्यंत पोहोचली असून त्यातील ७१६ रूग्ण बरे झाले आहेत.