नवी दिल्ली -भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. देश-विदेशमधील घटनांवर तो आपली प्रतिक्रिया मजेशीर पद्धतीने देत असतो. आता सेहवागने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.
सेहवागने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रम्प यांचा एक फोटो शेअर करत, ट्रम्प यांना ट्रोल केले आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव जो बायडेन यांनी केला. यावर सेहवागने एक मेसेज लिहिला आहे. यात त्याने, नो ट्रम्प तात्या..., त्यांची कॉमेडी आम्ही मिस करू, असे म्हटलं आहे.
जो बायडेन यांनी पेनसिल्व्हेनिया राज्यातील निर्णायक मते मिळवत अमेरिका अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला २७० हा बहुमताचा आकडा गाठला. त्यांच्या खात्यात २८४ इलेक्टोरल व्होट्स आहेत. तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. अजूनही काही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असली तरी बायडेन हेच अमेरिकेच्या अध्यक्षपदी असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष बनल्या आहेत.
कमला हॅरिस यांचे भारताशी नाते
कमला हॅरिस भारतीय-आफ्रिकन वंशाच्या असून त्यांचे आजोळ तामिळनाडूत आहे. लहानपणीचा बराच काळ कमला हॅरिस यांनी तामिळनाडूत घालवला आहे. कमला हॅरिस या भारतीय-आफ्रिकन वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांच्या आई श्यामला गोपालन या मूळच्या तामिळनाडूतील होत्या. मात्र, शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर त्या तिकडेच स्थायिक झाल्या. श्यामला यांचे पती आफ्रिकन वंशाचे होते. श्यामला गोपालन या नावाजलेल्या कॅन्सर संशोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या. परदेशात राहत असताना आपल्या मुलांची नाळ भारतासोबत जुळलेली असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कमला यांचे आई-वडील विभक्त झाल्यानंतर कमला हॅरिस आणि त्यांची बहीण माया दोघीजणी आईकडे राहत होत्या.