नवी दिल्ली -चीनमधील प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून क्रीडा क्षेत्रातही या व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. अशातच, स्कॉटलंडचा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू माजिद हक हा कोरोना व्हायरस चाचणीत 'पॉझिटीव्ह' सापडला आहे.
हेही वाचा -कोरोनावर पीटरसनचे 'हिंदी' ट्विट व्हायरल...
२००६ ते २०१५ पर्यंत स्कॉटलंडकडून ५४ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळणार्या फिरकीपटू हकने शुक्रवारी ही माहिती दिली. ग्लासगो येथील रॉयल अलेक्झांड्रा हॉस्पिटलमध्ये या ३७ वर्षीय खेळाडूवर उपचार सुरू आहेत. २०१५ मध्ये झालेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत माजिदला संघात स्थान देण्यात आले होते. नेल्सनमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने फक्त १ धाव केली होती.
स्कॉटलंडमध्ये गुरुवारी कोरोना व्हायरसच्या २६६ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक क्रीडा स्पर्धा, स्पर्धा आणि क्रिकेट मालिका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.