नवी दिल्ली - क्रिकेट विश्वात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या २४ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम केले आहेत. १६ नोव्हेंबर २०१३ ला सचिनने आपल्या करियरमधील शेवटचा सामना वेस्ट इंडीजविरुध्द खेळत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषीत केली. अद्यापही सचिनची क्रेझ क्रिकेटप्रेमींमध्ये जशास तशी आहे. लाखो क्रिकेट रसिकांच्या मनात घर केलेल्या सचिनला सलामीला खेळण्यासाठी विनंती करावी लागली, ही बाब खुद्द सचिनने सांगितली.
सचिनने एका मुलाखतीत सांगितले की, '१९९४ साली न्यूझीलंड विरोधातील एकदिवसीय सामन्यात भारताकडून सलामीला उतरण्यासाठी मला संधी मिळावी, अशी विनंती मी संघ व्यवस्थापनाकडे केली. मात्र, सचिनला सलामीला संधी देण्यासाठी संघातील तेव्हाचे खेळाडू तयार नव्हते. पण सचिनचा हट्ट अखेर खरा ठरला आणि तो सलामीला उतरला आणि त्याने ८२ धावांची खेळी केली.
जेव्हा मी सलामीला सुरुवात केली, तेव्हा संघाचा कल हा सुरुवातीला विकेट वाचवण्याकडे होता. पण मी काहीतरी वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला. सलामीला फलंदाजीला येऊन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवावे, अशी माझी योजना होती. याच दृष्टीने मी खेळ केला, असे सचिनने सांगितले.