महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC World Test Championship: सोप्या शब्दात जाणून घ्या, कोणता संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार अंतिम सामना

न्यूझीलंडचा संघ जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता दुसऱ्या फायनलिस्टसाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ शर्यतीत आहेत.

scenario-for-teams-to-join-new-zealand-in-wtc-final
Icc World Test Championship: सोप्या शब्दात जाणून घ्या, कोणता संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार अंतिम सामना

By

Published : Feb 2, 2021, 6:50 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केला. उभय संघातील ३ सामन्याची कसोटी मालिका स्थगित झाल्याचा फायदा न्यूझीलंड संघाला झाला. न्यूझीलंडचा संघ जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता दुसऱ्या फायनलिस्टसाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ शर्यतीत आहेत.

फेब्रुवारीच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार होता. पण कोरोनाच्या धोक्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने, आम्ही हा दौरा स्थगित केला असल्याचे आफ्रिका बोर्डाला कळवले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर, न्यूझीलंडचा संघ जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. आता भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत पोहोचण्याची चुरस आहे.

असे मिळेल भारतीय संघाला अंतिम सामन्याचे तिकीट

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड आहे. असे असले तरी, इंग्लंडचा संघ भारताला कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. उभय संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ४-०, ३-०, ३-१, २-० किंवा २-१ असा निकाल लावावा लागेल. तरच भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू शकेल.

इंग्लंडला आहे अशी संधी -

इंग्लंडला लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताला ४-०, ३-० किंवा ३-१ अशा फरकाने नमवावे लागेल. पण भारतीय संघाची कामगिरी पाहता इंग्लंडला असा निकाल लावण्यासाठी सर्वोत्कृष्ठ कामगिरी करावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाची मदार भारत-इंग्लंड मालिकेच्या निकालावर

जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या, शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा संघ कायम आहे. पण त्यांची मदार ही भारत-इंग्लंड यांच्यातील मालिका निकालावर आहे. यात भारत-इंग्लंड ही मालिका जर २-२, १-१ किंवा ०-० ने अनिर्णीत राहिली तर ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. याशिवाय इंग्लंडच्या संघाने जर भारताला १-०, २-० किंवा २-१ ने पराभूत केले तर ऑस्ट्रेलियाच्या संघ अंतिम फेरीत दाखल होईल. याशिवाय भारतीय संघाने जरी इंग्लंडविरुद्धची मालिका १-० अशी जिंकली तरी ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या दरम्यान, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाणार आहे.

हेही वाचा -VIDEO : चालू सामन्यात क्षेत्ररक्षक कपडे बदलण्यात व्यस्त अन् चेंडू सीमारेषेपार

हेही वाचा -भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत इरफान पठानची भविष्यवाणी, म्हणाला...

ABOUT THE AUTHOR

...view details