नवी दिल्ली - भारताचे माजी यष्टीरक्षक फारूख इंजिनिअर यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह निवड समितीवर जहरी टीका केली आहे. विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान, निवड समितीतीतील काही लोक अनुष्का शर्माला चहाचा कप देण्याचे काम करत होते, अशा शब्दात इंजिनिअर यांनी निवड समितीचा समाचार घेतला आहे.
फारूख हे नेहमी वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी आता एका मुलाखतीत, निवड समितीला लक्ष्य केले. ते मुलाखतीदरम्यान म्हणाले की, 'सध्या असलेल्या निवड समितीकडे अनुभव नाही. ही खरे तर मिकी माऊसवाली समिती आहे. विराट कोहलीचे योगदान भारतासाठी महत्त्वाचे आहे, पण निवड समितीला अनुभव आहे का? संपूर्ण निवड समिती १०-१२ कसोटी सामने खेळलेली आहे.'
विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान, मी भारतीय संघाचे कोट परिधान केलेल्या एका सदस्याला विचारले, तु कोण आहेस. तेव्हा त्याने सांगितले की मी निवड समितीचा सदस्य आहे. एवढेच काय, मी निवड समितीच्या एका सदस्याला अनुष्काला चहा देण्याचे काम करताना पाहिले असल्याचा, खळबळजनक आरोप इंजिनिअर यांनी केला आहे.
फारूख इंजिनियर यांनी निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर त्यांनी दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीच्या प्रमुखपदी यावे, अशी मागणीही केली.