मँचेस्टर - इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात १ सप्टेंबरला तिसरा टी-२० सामना मँचेस्टर येथे झाला. हा सामना पाकिस्तानने ५ धावांनी जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात मोहम्मद हाफिज आणि युवा हैदर अलीने अर्धशतक झळकावले. पण, चर्चा झाली ती सरफराज अहमदच्या स्टम्पिंगची. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सरफराजने स्टम्पिंग करण्याची सोपी संधी सोडली आणि त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
घडलं असे की, पाकिस्तानने दिलेल्या १९१ धावांचा पाठलाग करताना, इंग्लंडचा अष्टपैलू फलंदाज मोईन अली ७ धावांवर खेळत होता. त्याला बाद करण्याची सोपी संधी सरफराज आली होती. इमाद वसिमच्या चेंडूवर मोइन अली पुढे जाऊन मोठा फटका खेळण्यास आला. पण चेंडू मिस झाला आणि यष्टीरक्षक सरफराजच्या हातात गेला. मोईनला सहज बाद करण्याची संधी सरफराजकडे होती. पण त्याला चेंडू नीट पकडता आला नाही. तो चेडू यष्टीला लावेपर्यंत मोईन अली क्रीजमध्ये पोहोचला.
सरफराजच्या या हुकलेल्या स्टम्पिंगच्या संधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका चाहत्याने, सरफराजच्या ठिकाणी धोनी असता, तर तो संपूर्ण संघाला स्टम्पिंग केला असता, असे म्हटलं आहे. याशिवाय, भारताचा माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया देखील त्या वेळेत दोघांना बाद केला, असता असे एकाने म्हटलं आहे. एकाने तर सरफराज स्टम्पिंग करण्यासाठी फलंदाजाच्या परवानगीची वाट पाहत आहे, असे म्हटलं आहे.
दरम्यान, सरफराजने ही संधी सोडली तेव्हा मोईन अली ७ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलत अर्धशतक झळकावले. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने ३३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. पण तो मोक्याच्या क्षणी बाद झाला यामुळे इंग्लंडने सामना गमावला. वहाब रियाजने त्याला १९ व्या षटकात बाद केले आणि सामना पाकिस्तानच्या बाजूने फिरवला.