मुंबई - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटिझन्स भरभरुन कमेंट करत आहेत. तो फोटो आहे सरफराज अहमद जांबई देतानाचा. क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे की, सरफराज क्रिकेटच्या तिनही प्रकारामध्ये जांभई देणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. नुकतीच इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील ३ सामन्याची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. या दौऱ्यात सरफराज अहमद पाक संघात होता. पण त्याला अखेरचा टी-२० सामना वगळता अन्य सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेरच्या सामन्यात त्याला फलंदाजी मिळाली नाही. कर्णधारपदावरून काढून टाकलेल्या सरफराज अहमदने इंग्लंड मालिकेसाठी पुनरागमन केले, पण तो शेवटचा सामना वगळता संपूर्ण वेळ तो बेंचवर बसलेला दिसला.
सरफराज इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या टी-२० सामन्यादरम्यान, जांभई देताना दिसला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो स्टँडवर बसून सामना पाहत होता. त्यावेळी जांभई देतानाचा त्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे.
टी-२० मालिकेआधी इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. इंग्लंडने ही मालिका १-० ने जिंकली. या कसोटी मालिकेदरम्यानही तो जांभई देताना दिसला होता. दरम्यान, याआधी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात तो जांभई देताना दिसला होता.
सरफराज कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा क्रिकेटच्या तिनही प्रकारामध्ये जांभई देताना पाहायला मिळाला. यामुळे नेटिझन्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. या दरम्यान, एका चाहत्याने सरफराज क्रिकेटच्या तिनही प्रकारामध्ये जांभई देणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे, असे कमेंट केली आहे. यासोबत त्याने सरफराज जांभई देतानाचा फोटो शेअर केला आहे.