नवी दिल्ली -आयपीएल आणि मर्यादित षटकांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय कसोटी संघात निवड झाल्याबद्दल लोकेश राहुल अत्यंत भाग्यवान असल्याचे मत माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दिले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर-जानेवारीत होणार्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी राहुलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार राहुलने लीगच्या सध्याच्या हंगामात आतापर्यंत १२ सामन्यांत ५९५ धावा केल्या आहेत. आयपीएलची प्रतिष्ठित 'ऑरेंज कॅप'ही त्याच्याकडे आहे. मांजरेकर म्हणाले, ''आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे कसोटी संघाचा खेळाडू निवडला जातो, हे एक वाईट उदाहरण आहे. खासकरुन जेव्हा खेळाडूचे शेवटचे काही कसोटी सामने चांगले नसतात. अशा निवडीमुळे रणजीत खेळणार्या खेळाडूंचे मनोबल तोडले जाते. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध राहुलने सरासरी धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये कामगिरी केल्यामुळे तो खूप भाग्यवान आहे. त्या आधारावर, त्याला कसोटी संघात बोलावण्यात आले. आता या संधीचा सर्वात जास्त फायदा होईल अशी आशा त्याने करावी. माझ्या त्याला शुभेच्छा." मांजरेकरांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा ट्रोल झाले आहेत.