मुंबई -भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आपल्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. या वक्तव्यामुळे त्यांना कधीकधी ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांच्यातील वाद हे जगजाहीर आहेत. आता मांजरेकरांनी पुन्हा एकदा जडेजासंबंधी वक्तव्य केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात जडेजाचा अंतिम अकरा संघात समावेश करण्यात आला. या निर्णयाबद्दल संजय मांजरेकरांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, "रवींद्र जडेजाशी मला कोणतीही समस्या नाही पण एकदिवसीय क्रिकेटसाठी जडेजासारखे खेळाडू योग्य नाहीत.''
हेही वाचा -कुस्तीपटू नरसिंह यादवला कोरोना
मांजरेकर इतक्यावर न थांबता त्यांनी हार्दिक पांड्याच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबद्दल मांजरेकर म्हणाले, की अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात पांड्या योग्य आहे. पण गोलंदाजीसाठी तो तंदुरुस्त नसला तर त्याला प्रमुख फलंदाज म्हणून संघात स्थान मिळू नये, त्याच्याऐवजी मनीष पांडेला संघात स्थान द्यावे.
स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्कार -
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ५० षटकांत ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावा करता आल्या. संघासाठी तडाखेबंद शतक ठोकणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. स्मिथने ६६ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकार लगावत १०५ धावा केल्या.