दुबई -तीन वेळा आयपीएल चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जचा यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. चेन्नईने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आठ गडी राखून पराभव केला. प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडलेला चेन्नई हा पहिला संघ ठरला. राजस्थान रॉयल्सच्या मुंबईवरील विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात आले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई प्रथमच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
या कामगिरीनंतर, चेन्नईचा कर्णधार धोनीची पत्नी साक्षी सिंह धोनीने सोशल मीडियावर एक कविता लिहिली.
चेन्नईची आयपीएल कामगिरी -
यंदाचा हंगाम धोनीसेनेसाठी वाईट ठरला. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांपैकी ८ सामने गमावले आहेत, तर केवळ ४ सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे झाले आहे की चेन्नईने साखळी फेरीतील ८ सामने गमावले आहेत. त्यामुळे सध्या चेन्नईचे आव्हान आयपीएलमधून संपल्याने ट्विटरवर चाहत्यांकडून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या हंगामाच्या आधी चेन्नईने खेळलेल्या सर्व १० आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे ८ वेळा त्यांनी अंतिम सामनाही खेळला आहे. त्यातील ३ वेळा विजय मिळत त्यांनी आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे.