मुंबई - भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान आता आपल्याला वेगळ्या भूमिकेत दिसू शकतो. झहीरला विधान परिषदेवर आमदार करण्यात यावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून ही मागणी केली.
झहीरसह १२ जणांची राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी विचार करण्यात यावा, असेही खोत यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यपाल विधान परिषदेवर १२ सदस्यांची नियुक्ती करतात. विज्ञान, कला, साहित्य, सहकार आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी ही नियुक्ती केली जाते.
झहीरशिवाय मकरंद अनासपुरे, अमर हबीब, निवृत्ती महाराज इंदोरीकर आणि प्रकाश आमटे यांच्याही नावांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारने या आधीच १२ सदस्यांची यादी राज्यपालांना पाठवली आहे. त्यावर राज्यपालांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी विनंतीसुद्धा केली आहे, मात्र त्यावर १५ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.
झहीर खानची कारकीर्द -
भारतासाठी झहीरने ९२ कसोटी सामने खेळताना ३११ बळी तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८२ बळी टिपले आहेत. भारताला २००३मध्ये उपविजेता आणि २०११मध्ये विश्वविजेता बनवण्यामध्ये झहीरचा सिंहाचा वाटा आहे. झहीरने १५ ऑक्टोबर २०१५ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. झहीरने मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाडगेबरोबर २०१७मध्ये लग्न केले आहे.