मुंबई -भारताच्या संगीतक्षेत्राची शान असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान फार मोठे मानले जाते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातल्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच मास्टर ब्लास्टर सचिननेही त्यांना एका व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -B'day Spl:मेरी आवाजही पेहचान है मेरी..संगीतात बहरलेली 'स्वरलता'
सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या. 'खरं सांगायचं तर मी तुमचं गाणं कधीपासून ऐकायला लागलो हे मलादेखील माहित नाही. तुमचं गाणं ऐकलं नाही असा एकही दिवस नाही. तुम्ही माझ्यासाठी एक खास गाणं गायलं होतं. तुम्ही मला नेहमी आईसारखी माया लावली. त्यासाठी मी नेहमीच तुमचा आभारी आहे. देशासाठी अमुल्य भेट तुम्हीच आहात. तुम्हाला वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा', असे सचिनने या व्हिडिओत म्हटले आहे.
लतादीदी अवघ्या १३ वर्षांच्या असताना त्यांच्यावरील पित्रुछत्र हरवले. तेव्हा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यांचे आप्त असलेले मास्टर विनायक यांचा तेव्हा त्यांना आधार मिळाला. लता मंगेशकर यांच्या कारकीर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली. 'पहिली मंगळागौर' या मराठी चित्रपटातील 'नटली चैत्राची नवलाई' हे गाणे त्यांनी स्वरबद्ध केले होते. गायनासोबतच त्यांनी या चित्रपटात छोटी भूमिकाही साकारली होती. १९४५ साली आलेल्या मास्टर विनायक यांच्या पहिल्या सिनेमात 'बडी माँ' या हिंदी सिनेमातही त्यांनी लहानशी भूमिका साकारली होती. १९४९ साली 'महल' चित्रपटातील 'आयेगा आनेवाला' या गाण्यामुळे लतादीदींना वेगळी ओळख निर्माण करुन दिली. अजूनही त्यांचे हे गाणे सर्वात कठीण गाण्यांपैकी एक मानले जाते.