पुणे -भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रहाणे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता. हा सामना जिंकल्यानंतर रहाणेने त्वरित मुंबई गाठले आणि 'नन्ही परी'ची भेट घेतली. क्रिकेटविश्वातील आजी-माजी खेळाडूंनी अजिंक्य आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या. मास्टर-ब्लास्टर सचिननेही रहाणेला गमतीशीर सल्ला देत त्याचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा -रोहित शर्माची कसोटी क्रमवारीत मोठी झेप, कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान
रहाणेने आपल्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या पोस्टवर सचिननेही रहाणेला एक सल्ला दिला. 'राधिका आणि अजिंक्य तुम्हाला खूप शुभेच्छा. पहिल्यांदा पालक बनण्याचा आनंद खूप मोठा आहे. त्याची मजा घ्या. आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी नाईट वॉचमनच्या भूमिकेत तयार रहा', असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.
अजिंक्य आणि राधिका हे शाळेतील मित्र तसेच शेजारी होते. दोघेही सोबतच लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही २६ सप्टेंबर २०१४ मध्ये विवाहबध्द झाले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटीला १० ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना पुण्यात खेळवण्यात येईल.