बर्लिन- भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय संघाने २०११ मध्ये आयसीसीच्या विश्व करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या टिपलेल्या क्षणाला २०००-२०२० या कालावधील क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
अंतिम सामन्यात श्रीलंकाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सचिन तेंडुलकरला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला 'कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन' असे शिर्षक देण्यात आले आहे. भारताने विश्व करंडक जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर घेत 'लॅप ऑफ ऑनर' दिला होता. अनेक वर्ष देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनला तेव्हा आश्रू रोखता आले नव्हते. या क्षणाचा तो फोटो आहे.