मुंबई- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सातत्यपूर्ण कामगिरी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. यामुळेच त्याची तुलना मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. विराटने सचिनचे अनेक विक्रमही मोडीत काढले आहे. विराट सद्या जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. विराटच्या फलंदाजीवर जगभरातील क्रिकेटप्रेमींसह पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू सरफराज नवाझही खूश आहे. त्यांनी विराट सचिनचे सर्व विक्रम मोडेल असे भाकित वर्तवलं आहे.
सरफराज यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील तुलनेबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले, 'विराट कोहलीची तुलना जगातील कोणत्याही खेळाडूशी होऊ शकत नाही. तो सचिन तेंडुलकरला सर्व आघाडींमध्ये मागे टाकतो. इनस्विंग चेंडूवर खेळताना सचिन चाचपडायचा. पण विराट इनस्विंगवर सहजतेनं फलंदाजी करतो. विराटही कारकिर्दीच्या सुरुवातीला इनस्विंगवर चाचपडायचा, परंतु आता तो फलंदाजीत तरबेज झाला आहे.'