नवी दिल्ली -भारताची लोकप्रिय सलामीवीर जोडी सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा मैदानात गोलंदाजांची धुलाई करताना दिसणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये ही जोडी खेळणार आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूही सहभागी होणार आहेत.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी-२० स्पर्धेत क्रिकेट खेळणाऱ्या संघातील पाच संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि भारत या संघाचा समावेश असणार असल्याचे समजते. दरम्यान, या स्पर्धेत सचिन, सेहवाग यांच्यासह, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, जॉन्टी रोड्स सारखे दिग्गज खेळाडूही सहभागी होणार आहेत.