मुंबई - भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना एक व्हिडिओ शेअर केला. प्रेरणा देणारा व्हिडिओ पाहून नव्या वर्षाला सुरुवात करा, असे सचिनने म्हटले. दिव्यांग खेळाडूचा शेअर केलेल्या व्हिडिओमधील मुलाचे नाव मड्डाराम कवासी असे असून खुद्द सचिनने त्याचा व्हिडिओ शेअर केल्याने, अभिमान वाटत असल्याचे त्याने सांगितले.
सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओत, मड्डाराम क्रिकेट खेळताना दिसत आहे. मड्डाराम हा दिव्यांग असूनही क्रिकेट खेळताना तो हातांच्या मदतीने धावताना दिसत आहे. स्ट्राइक बदलल्यानंतर पुन्हा बॅट परत देण्यासाठीही तो सर्वसामान्यांप्रमाणे खेळपट्टीच्या मध्यापर्यंत गेला. त्याचा हा व्हिडिओ सचिनने शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांनी या मुलाचे कौतुक केले.
मड्डाराम छत्तीसगडच्या दंडेवाडा जिल्ह्यातील बंगळुरू गावात राहतो. तो सातवीमध्ये शिकत आहे. सचिनने माझा व्हिडिओ शेअर केला हे पाहून मला माझा अभिमान वाटतो, असे मड्डारामने सांगितले. मी सचिनला धन्यवाद देऊ इच्छितो, तसेच सचिनला माझ्या गावी येण्यासाठी आमंत्रण देतो, असेही मड्डारामने सांगितलं.