मुंबई- क्रिकेटच्या इतिहासात भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे. सचिन, बहुताशं लोकांना सलामीवीर फलंदाज असल्याचे माहित असेल. पण सुरूवातीच्या काळात सचिन मधल्या फळीत फलंदाजी करत असे. सलामीला खेळण्याची संधी मिळावी, यासाठी सचिनला कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन आणि संघ व्यवस्थापनाला विनंती करावी लागली होती. ही बाब अनेकांना कदाचित माहित नसेल.
सलामीवर नवज्योत सिंग सिद्धूला दुखापत झाली. तेव्हा सलामीच्या फलंदाजाचा प्रश्न, भारतीय संघ व्यवस्थापनाबरोबर कर्णधार अझरुद्दीनसमोर उपस्थित झाला. तेव्हा अझरुद्दीनने सलामीला कोण उतरणार असा सवाल केला असता, सचिनने मी सलामीला खेळेन, असे सांगितले. तेव्हा याला भारतीय व्यवस्थापनानेही मान्यता दिली आणि सचिन ऑकलंडमध्ये पहिल्यांदा सलामीला उतरला.
याविषयी सचिनने सांगितले की, 'जेव्हा मी हॉटेल सोडले होते. तेव्हा मला सलामीला खेळण्याची संधी मिळेल, याची कल्पनाही नव्हती. आम्ही मैदानावर पोहोचलो. तेव्हा अझर आणि संघाचे व्यवस्थापक अजित वाडेकर ड्रेसिंग रुममध्ये आले. त्यांनी सांगितले की, सिद्धूला दुखापत झाल्याने तो खेळू शकणार नाही. तुमच्यापैकी सलामीला खेळण्यासाठी कोण इच्छुक आहे, असे विचारताच मी होकार दिला.