मुंबई - इंग्लंडचा जेम्स अँडरसन हा सध्याच्या गोलंदाजामध्ये रिव्हर्स स्विंग करणारा सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने दिले आहे. सचिनने 100 एमबी अॅपवर वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज ब्रायन लाराशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
तो म्हणाला, "अँडरसन आऊटस्विंगसाठी जसा चेंडू पकडतो त्याप्रमाणे तो चेंडू सोडताना आत आणण्याचा प्रयत्न करतो. मी हे अनुभवले आहे. खूप फलंदाज त्याच्या मनगटाकडे पाहतात. परंतू तो कोणत्या बाजूला चेंडू टाकतो, हे बुचकळ्यात टाकणारे असते. तो तुम्हाला आउटस्विंगरसाठी खेळण्यासाठी प्रवृत्त करतो.''
सचिन म्हणाला, की अँडरसनचा जोडीदार स्टुअर्ट ब्रॉडनेही असे करण्यास सुरुवात केली आहे. तो म्हणाला, "आता मला हे दिसते आहे, की ब्रॉडदेखील हेच करत आहे. परंतु अँडरसनने याची सुरुवात खूप आधी केली होती. म्हणून मी त्याला एक चांगला गोलंदाज मानतो. तो स्विंग रिव्हर्स करू शकणार्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे."
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघातील कसोटी मालिकेतून क्रिकेट परतले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना बुधवारपासून सुरू झाला. तथापि, कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे.