नवी दिल्ली -भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९०व्या वर्षी पंडित जसराज यांनी अखेरचा श्वास घेतला.
सचिनने ट्विटरमार्फत आपल्या भावना शेअर केल्या आहेत. तो म्हणाला, "पद्मविभूषण पंडित जसराजजी यांच्या निधनाबद्दल मला जे दु:ख होत आहे ते व्यक्त करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. ते थोर संगीतकार होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. मी त्यांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांसोबत मनापासून शोक व्यक्त करतो. ओम शांती."
माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणनेही जसराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी भोपाळमध्ये झाला. जसराज हे लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांचे मोठेभाऊ पंडित मणिराम यांनी त्यांचा सांभाळ केला. लहान वयातच जसराज यांनी गाण्यावर प्रभुत्व मिळवले. भारतासह अमेरिका, कॅनडा येथे त्यांचे अनेक शिष्य आहेत.
पंडित जसराज यांना भारत सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पंडित जसराज यांचे शिष्य हे सध्या नामांकित संगीतकार आहेत. पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल यूनियनने (आयएयू) ११ नोव्हेंबर २००६ रोजी मंगळ आणि गुरु ग्रहांदरम्यान सापडलेल्या लघुग्रहाला पंडित जसराज यांचे नाव दिले होते.