मुंबई - भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने क्रिकेट इतिहासात अनेक विक्रमांनाची नोंद केली आहे. जे आजघडीपर्यंत कोणत्याही खेळाडूला तोडता आलेले नाही. पुढील दशकभरातही ते विक्रम तोडता येणे शक्य वाटत नाही. सचिनचा असाच विक्रम म्हणजे, शतकाचे 'महाशतक'. सचिनने आजच्या दिवशीच १६ मार्च २०१२ ला शतकाचे महाशतक पूर्ण केले होते.
सचिनने १६ मार्च २०१२ ला बांगलादेशविरुद्ध मीरपूर येथे शेर-ए-बांगला स्टेडियमवर १४७ चेंडूत ११४ धावांची खेळी साकारली होती. सचिनचे हे १०० वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज होता. आता देखील सचिन हा एकमेव फलंदाज आहे ज्याच्या नावावर १०० शतकांची नोंद आहे. आजचा दिवस सचिनसाठी खास आहे.
सचिनने आपल्या कारकिर्दीतील ९९ वे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले होते. त्याने १२ मार्च २०११ विश्व करंडक स्पर्धेत खेळताना ही शतकी खेळी केली होती. यानंतर सचिनला १०० वे शतक करण्यासाठी १ वर्ष ४ दिवस वाट पाहावी लागली. या काळात सचिन तब्बल ३४ वेळा शतकाजवळ पोहोचला पण त्याला १०० वे शतक करणे जमले नाही. अखेर १६ मार्च २०१२ चा दिवस उजाडला आणि सचिनने ९९ धावावर असताना, मशरफे मुर्तुजाच्या गोलंदाजीवर एक धाव घेत शतक पूर्ण केले.