नवी दिल्ली -भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आयसीसीला एक सल्ला दिला आहे. एलबीडब्ल्यूसाठी मागितलेल्या डीआरएसवरील नियम बदलण्यासाठी त्याने आपली प्रतिक्रिया दिली.
ट्विटरवरील एका व्हिडिओमध्ये तो म्हणाला, ''जर कॅमेऱ्यामध्ये चेंडू स्टम्पला स्पर्श केलेला दाखवत असेल, तर फलंदाज बाद होणे आवश्यक आहे.'' या व्हिडिओमध्ये सचिन वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराशी डीआरएस प्रणालीविषयी चर्चा करताना दिसत आहे.
लाराशी बोलताना तो म्हणाला, ''आयसीसीच्या या निर्णयाशी मी सहमत नाही. हा नियम आयसीसी बर्याच काळापासून वापरत आहे.'' सध्या एलबीडब्ल्यूच्या डीआरएस प्रणालीतील नियमांनुसार, जर पंचाने फलंदाजाला बाद दिले नसेल, विरोधी संघाने डीआरएसकडे विचारणा केली असेल आणि किमान 50%पेक्षा जास्त चेंडू स्टम्पला स्पर्श करत असेल, तर पंचांचा निर्णय बदलला जाऊ शकतो. मात्र, असे नाही झाले तर तो निर्णय 'अंपायर्स कॉल' म्हणून तसाच राहतो.
जर निर्णय 'अंपायर्स कॉल' असेल, तर विरूद्ध संघाचा तो डीआरएस वाया जात नाही. मात्र, फलंदाजालाही बाद दिले जात नाही. त्याचवेळी, जेव्हा फलंदाज डीआरएससाठी विचारतो तेव्हादेखील फलंदाजी करणाऱ्या संघाचा डीआरएस कायम राहतो.