पुणे -भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत एक ट्विट केले. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना याविषयी विचारले असता, पवार यांनी सचिनला एक सल्ला दिला आहे.
पुण्यात गणेश कला क्रीडा येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी अभिवादन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांना पत्रकारांनी सचिनच्या भुमिकेबद्दल प्रश्न विचारला. यावर, सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे व्यक्त होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी, असा माझा सचिनला सल्ला राहील, असे शरद पवार म्हणाले.
काय आहे प्रकरण -
रिहाना, ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफा या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे टि्वट केले. यावर देशातील अनेक सेलिब्रिटींनी त्या विरोधात भूमिका घेतली. तर काही भारतीय सेलिब्रिटींनी त्यांचे समर्थन केले. यात काहींनी देशवासियांना एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. त्यात सचिनचा देखील सहभाग होता.