सेंचुरियन -दक्षिण आफ्रिका संघाने दुखापतीने बेजार झालेल्या श्रीलंका संघाचा पहिल्या कसोटी सामन्यात १ डाव ४५ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह आफ्रिकेने दोन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या सामन्यात श्रीलंकेचे पाच खेळाडू जखमी झाले. यात धनंजय डी सिल्वा तर दुसऱ्या डावात फलंदाजीला देखील उतरला नाही. श्रीलंकेचा संघ चौथ्या दिवसाच्या लंचआधी १८० धावांत ऑलआऊट झाला. दरम्यान, ही मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली जात आहे. यात दक्षिण आफ्रिकेने विजयासह ६० गुणांची कमाई केली आहे.
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेने फाफ ड्यू प्लेसिसच्या १९९ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ६२१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ १८० धावात आटोपला. कुशल परेरा (६४) आणि वाहिंदु हसरंगा (५९) यांनी थोडाफार प्रतिकार करत श्रीलंकेचा पराभव लांबवला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, एनरिक नार्खिया, वियान मुल्डेर आणि लुथो सिपाम्ला यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.