सेंचुरियन- दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना इंग्लंडने जिंकला. कर्णधार ईऑन मॉर्गन (५७ धावा), जोस बटलर (५७) आणि जॉनी बेअरस्टो (६४) या तिघांनी अर्धशतकी खेळी करत इंग्लंडच्या विजयात योगदान दिले. आफ्रिकेने दिलेले २२३ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ५ चेंडू आणि ५ गडी राखून पूर्ण केले. या विजयासह इंग्लंडने ३ सामन्याची मालिका २-१ ने जिंकली.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बाउमा यांनी ८४ धावांची सलामी दिली. डी कॉक (३५) आणि बाउमा (४९) ठरावीक अंतराने बाद झाले. तेव्हा मधल्या फळीतील हेन्रीच क्लासेनच्या फटकेबाजीमुळे (३३ चेंडूत ६६ धावा) आफ्रिकेने २० षटकात ६ बाद २२२ धावांचा डोंगर उभारला. हेन्रीचला डेव्हिड मिलरने ३५ धावा करत चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरूवात खराब झाली. जेसन रॉय ७ धावांवर माघारी परतला. तेव्हा बटलर आणि बेअरस्टो या जोडीने ९१ धावांची भागिदारी करत इंग्लंडला सावरलं. बेअरस्टो आणि बटलर अनुक्रमे ६४ आणि ५७ धावांवर बाद झाले. तेव्हा मॉर्गनने संघाला विजय मिळवून दिला. त्याने २२ चेंडूत नाबाद ५७ धावा झोडपल्या. यात त्याने ७ षटकार लगावले. त्याला बेन स्टोक्सने २२ धावा करत चांगली साथ दिली. मॉर्गनला 'मालिकावीर आणि सामनावीर' असा दुहेरी पुरस्कार मिळाला.