सिडनी -न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात मोठा इतिहास रचला. टेलर आपल्या देशासाठी कसोटी स्वरूपात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या स्टीफन फ्लेमिंगला टेलरने मागे टाकले. टेलरने या विक्रमाचे सर्व श्रेय आपल्या गुरुला दिले आहे.
हेही वाचा -WWE मधील सामने फिक्स असतात!... 'द ग्रेट खली'ने केला गौप्यस्फोट
कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा रचणाऱ्या टेलरने आपल्या यशाचे श्रेय माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मार्टिन क्रो यांना दिले. 'क्रो यांनी कसोटी क्रिकेटमधील माझ्या गुणवत्तेचे कौतुक केले. देशासाठी सर्वाधिक धावा करण्याचे लक्ष्य त्यांनी माझ्यासमोर ठेवले होते. त्यावेळी मला त्यांच्यावर विश्वास नव्हता. परंतु, ते आता इथे असते तर, मला खूप आनंद झाला असता', असे टेलरने म्हटले.
'जेव्हा मी न्यूझीलंडकडून खेळू लागलो होतो, तेव्हा मी एकदिवसीय क्रिकेटमधील चांगला खेळाडू होतो. मी प्रथम श्रेणीमध्ये तीन-चार शतके केली होती आणि टी-२० क्रिकेटच्या जन्माचा तो कालावधी होता. मला नेहमीच वाटायचे की, मी एकदिवसीय क्रिकेटसाठी योग्य फलंदाज आहे पण कसोटी क्रिकेटबद्दल मला तेवढा विश्वास नव्हता. म्हणून मी क्रो यांची मदत घेतली जेणेकरून मी एक चांगला खेळाडू होऊ शकेन', असे टेलरने भूतकाळातील आठवणींना उजाळा देताना म्हटले.
३५ वर्षीय टेलरचा हा ९९ वा कसोटी सामना होता. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या स्टीफन फ्लेमिंगला टेलरने मागे टाकले. फ्लेमिंगने १११ कसोटी सामन्यांमध्ये ४०.०६ च्या सरासरीने ७ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ७१७२ धावा केल्या होत्या. टेलरने कसोटी कारकिर्दीत ४६ च्या सरासरीने ७१७४ धावा केल्या.