सिडनी - न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने कसोटीतील मोठा विक्रम आपल्या नावे केला. टेलर आपल्या देशासाठी कसोटी स्वरूपात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने हा विक्रम रचला. चहापानानंतरच्या सत्रात तीन धावा करत टेलरने हा बहुमान पटकावला.
हेही वाचा -#HBDKapilDev : क्रिकेटच्या कारकिर्दीत कधीही 'रनआऊट' न झालेला क्रिकेटपटू
३५ वर्षीय टेलरचा हा ९९ वा कसोटी सामना होता. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या स्टीफन फ्लेमिंगला टेलरने मागे टाकले. फ्लेमिंगने १११ कसोटी सामन्यांमध्ये ४०.०६ च्या सरासरीने ७ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ७१७२ धावा केल्या होत्या. टेलरने आजच्या सामन्यात ४२ चेंडूत २२ धावा केल्या. त्यासह टेलरने कसोटी कारकिर्दीत ४६ च्या सरासरीने ७१७४ धावा केल्या. टेलरला १९ व्या षटकात पॅट कमिन्सने माघारी धाडले.
न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम ६,४५३ धावांसह तिसर्या स्थानावर आहे. कर्णधार केन विल्यमसन ६,३७९ धावांसह चौथ्या क्रमांकावर आणि मार्टिन क्रो ५,४४४ धावांसह पाचव्या स्थानी आहे.