नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने 2014 मध्ये आजच्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावा केल्या होत्या. कोलकाताच्या ईडन-गार्डन मैदानावर रोहितने श्रीलंकेविरूद्ध 264 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. रोहितच्या या ऐतिहासिक खेळीची व्हिडिओ लिंक बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केली आहे.
पहिल्या 50 धावा करण्यासाठी 72 चेंडू, पण..
बीसीसीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2014 मध्ये आजच्याच दिवशी रोहित शर्माने वैयक्तिक 264 धावा करून इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या खेळीत रोहितने 33 चौकार आणि नऊ षटकार लगावले होते.
रोहितने 173 चेंडूमध्ये 33 चौकार आणि नऊ षटकार लगावले. पहिल्या 50 धावा करण्यासाठी त्याला 72 चेंडू लागले होते. त्यानंतर मात्र त्याने आपला गियर बदलला आणि पुढच्या 28 चेंडूत 50 धावा करत शतक पूर्ण केले. 100 पासून 150 धावांचा पल्ला त्याने 25 चेंडूत पूर्ण केला तर 151 चेंडूंत 200 धावा पूर्ण केल्या.
श्रीलंकेला केवळ 251 धावा करता आल्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) सोशल मीडिया रोहितच्या खेळीविषयी ट्विट करून क्रीडा प्रेमींना त्या ऐतिहासिक खेळीची आठवण करून दिली. रोहितच्या या बहारदार खेळीच्या जोरावर भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात 404 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेला केवळ 251 धावा करता आल्या आणि हा सामना भारताने 153 धावांनी जिंकला.
224 एकदिवसीय सामन्यांच्या कारकीर्दीत रोहितने तीन दुहेरी शतके ठोकली आहेत. त्याने एकूण 29 शतके आणि 43 अर्धशतके झळकावली आहेत. नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले.