मुंबई- भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. त्याने आपल्या कुटुंबियासोबत दिवा लावून या अभियानाला प्रतिसाद दिला. दरम्यान, रोहितने या संदर्भात ट्वीट केले असून ते ट्विट सद्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदींनी, कोरोनाच्या अंधःकारामधून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. रविवारी ५ एप्रिलला आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यामुळे चारही दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यातून आपल्या एकतेचा संदेश जाईल, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला रोहितने त्याच्या राहत्या घरी दिवा लावून पाठिंबा दर्शवला.
रोहितने या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'तुम्ही घरातच राहा. बाहेर रस्त्यावर येऊन आनंदोत्सव साजरा करु नका. विश्व कप होण्यासाठी अद्याप वेळ आहे.'
रोहित शर्माने कोरोना लढ्यासाठी एकूण ८० लाख रुपयाचे दान दिले आहे. यात त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ४५ लाख, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख, Zomato Feeding India आणि भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या WelfareOfStrayDogs. संस्थेला प्रत्येकी ५ लाखांची मदत केली आहे.
मोदींच्या दिवा लावण्याच्या आवाहनाला सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, हिमा दास, मेरी कोम, मनिका बत्रा, सायना नेहवाल, हार्दिक पांड्या, कृ्णाल पांड्या, सुरेश रैना, लोकेश राहुल, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, शिखर धवन, संजू सॅमसन, मोहम्मद कैफ, पी. व्ही. सिंधू, बजरंग पूनिया, गीता फोगाट, बबिता फोगाट आणि भारतीय फुटबॉल संघाचे सर्व खेळाडूंनी दिवा, मेणबत्ती लावून पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये 'फुलराणी' काय करते?, पहा व्हिडिओ
हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये फटाके मिळतातच कसे?, फटाके फोडणाऱ्यांवर भडकले क्रिकेटपटू