मुंबई- न्यूझीलंडचा टी-२० मालिकेत ५-० ने सफाया केल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुखपातीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळे त्याला अर्ध्यातच मैदान सोडावे लागले होते. दरम्यान रोहितची दुखापत गंभीर असल्याने, तो एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिलेली आहे, मात्र अद्यापही बीसीसीआयकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.