मुंबई- मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे क्रूर गोलंदाज आहेत. ते दोघेही संघाच्या सराव सत्रात बाऊंसरचा मारा करत, फलंदाजांचे डोके आणि शरीराला लक्ष्य करतात, असा खुलासा भारताचा हिटमॅन सलामीवीर रोहित शर्माने केला. रोहितने हा खुलासा एका ऑनलाईन शोमध्ये केला. तसेच त्याने, शमीच्या गोलंदाजीची शिकार भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधानाही ठरली, असल्याचेही सांगितलं.
रोहित शर्मा 'डबल ट्रबल विद जेमी अॅन्ड स्मृती शो' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यात भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज जेमिमा रोड्रिग्जने, रोहितला नेट सरावात कोणते गोलंदाज अडचणीत आणतात असा सवाल केला. यावर रोहितने सांगितले, 'मोहम्मद शमीसोबत मी २०१२-१३ पासून खेळत आहे. तो नेटमध्ये गोलंदाजी करणे पसंत करत नाही. पण तो जेव्हा नेट सरावात गोलंदाजीसाठी येतो. ते त्वेषाने मारा करतो. फलंदाजावर अजिबात दयामाया दाखवत नाही. शमी आणि बुमराह यांच्यात शर्यत लागलेली असते की कोण किती चेंडू बीट करेल. दोघे चेंडूने फलंदाजाच्या डोक्याला लक्ष्य करण्यासाठी प्राधान्य देतात. या दोघांच्या शर्यतीत फलंदाजाची गोची होते.'