दुबई - ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी संघात स्थान न मिळाल्यानंतर भारतीय सलामीवीर रोहित शर्माने आपल्या ट्विटर व इन्स्टाग्राम अकाउंटच्या बायोवरून ''भारतीय क्रिकेटपटू'' हा टॅग काढून टाकला आहे. सोमवारी, बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारताची एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी संघांची घोषणा केली. यात रोहित शर्माला एकाही संघात स्थान दिलेले नाही.
रोहितला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो मुंबई इंडियन्ससाठी शेवटचे दोन सामने खेळू शकला नाही. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या जागी लोकेश राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ईशांत शर्माचेही संघात नाव नाही. वैद्यकीय पथक रोहित आणि ईशांतवर लक्ष ठेवतील, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे. याबद्दल सुनील गावसकर यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा -
आयपीएल २०२० स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया, तीन टी-२० सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.