नागपूर -बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ कसून कराव करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने फटकावलेल्या ८५ धावांच्या जोरावर भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवता आला होता. उद्या नागपूर येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात हाच फॉर्म रोहित कायम राखतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -ज्या संघाचे खेळाडू आपले कौशल्य सिद्ध करतील तोच संघ चॅम्पियन - रोहित शर्मा
दरम्यान, नागपूर येथे होणाऱ्या टी-२० सामन्यामध्ये रोहितला मोठा विक्रम खुणावतो आहे. रोहितने या सामन्यात केवळ २ षटकार ठोकले तर, त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय कारकर्दीत ४०० षटकार मारल्याच्या विक्रम नोंदवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कारकर्दीत सर्वाधिक षटकार मारल्याच्या यादीत वेस्ट इंडीज संघाचा आक्रमक फलंदाज क्रिस गेल (५३४) हा पहिल्या स्थानावर आहे. तर, पाकिस्तान संघाचा खेळाडू शाहिद आफ्रिदी (४७६) हा दुसऱ्या स्थानावर आहे.
आत्तापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला ४०० षटकारांचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे नागपूर येथे रंगणाऱ्या या निर्णायक सामन्यात तो हा विक्रम करतो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.