रांची -आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आणि हिटमॅन रोहित शर्माने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. सलामीवीर मयंक अग्रवाल स्वस्तात परतल्यानंतर रोहित शर्मा आणि अंजिक्य रहाणे या जोडीने भारताचा डाव सावरला. १४ चौकार आणि ४ षटकारांसह रोहितने शतक झळकावले आणि कारकिर्दीतील २००० धावांचा टप्पा पूर्ण केला.
हेही वाचा -'मला खात्री आहे, सरफराजला संघाबाहेर हाकलतील', शोएब अख्तरचा दावा
झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगलेल्या या तिसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहितने आपले शतक पूर्ण केले. या मालिकेतील रोहितचे हे तिसरे शतक आहे. विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात रोहितने शतक झळकावले आहे.
एका कसोटी मालिकेत तीन शतके झळकावणारा रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. शिवाय, यंदाच्या कॅलेंडर वर्षातील रोहितचे हे नववे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. त्यामुळे रोहितने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. मास्टर ब्लास्टरने १९९८ मध्ये ९ शतके झळकावली होती.
या सोबत रोहितने एका कसोटी मालिकेत सर्वात जास्त षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला. विंडीजच्या शिमरोन हेटमायरने २०१८ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत १५ षटकार खेचले होते. रोहितने या मालिकेत आतापर्यंत १७ षटकार ठोकले आहेत. एका मालिकेत भारताकडून सर्वाधित षटकारांचा विक्रम हरभजन सिंगच्या नावावर होता. त्याने २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १६ षटकार मारले होते.
दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकी कर्णधार फाफ डु-प्लेसिसच्या ठिकाणी टेम्बा बावुमा नाणेफेकसाठी आला होता. मात्र, त्यालाही नाणेफेक जिंकता आली नाही.