विशाखापट्टणम - दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी लोकेश राहुलला डच्चू देत सलामीवीर म्हणून रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला आणि त्याने आपली निवड सार्थ ठरवली. या सामन्याच्या दोन्ही डावांत रोहितने शतक झळकावले. या कसोटीत रोहितने सलामीवीर म्हणून विक्रम रचला असला तरी एका खास विक्रमात रोहितच्या आसपासही कोणी नाही.
हेही वाचा -टेनिस : कॅम्पिनास चॅलेंजर स्पर्धेत सुमित नागलचा पराभव
या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहितने ६ तर दुसऱ्या डावात ७ उत्तुंग षटकार ठोकले. क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने प्रथम स्थान मिळवले आहे. त्यामुळे हिटमॅनच्या खात्यावर आता २३९ षटकार जमा आहेत. रोहितने १४७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा ईऑन मॉर्गन विराजमान असून त्याने ९७ डावांमध्ये १२६ षटकार मारले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना आफ्रिकेविरुध्द दोन्ही डावात शतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरला. तसेच, त्याने भारताकडून एकाच सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणाऱ्यांच्या यादीतही स्थान मिळवले. यापूर्वी, भारताचे दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी तीन वेळा, राहुल द्रविडने दोन वेळा तर विजय हजारे, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांनी एकदा, दोन्ही डावात शतक लगावण्याचा पराक्रम केला आहे.